झावळ्यांना महिलांच्या कल्पकतेचा साज

झावळ्यांना महिलांच्या कल्पकतेचा साज


कलेला मिळतेय रोजगाराची जोड : पिळगावात कलाकतींची कार्यशाळा

डिचोली, ता. २६ (प्रतिनिधी): माडाच्या झावळ्यांपासून आकर्षक, सुंदर आणि पर्यावरणपूरक कलाकृती साकारण्याचे कौशल्य महिलांना अवगत व्हावे, तसेच त्यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने पिळगाव येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पिळगाव पंचायतीत सुरू असलेल्या या कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गोमंतकातील नामवंत कलाकार रामकृष्ण केरकर (गावडे) हे महिलांना या कलेचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करीत आहेत. पुणे येथील परसिस्टंट फाउंडेशनतर्फे 'सीएसआर' उपक्रमांतर्गत महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने 'एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पा' अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. बायफ लाईव्हलीहूड, पूर्णम फाउंडेशन आणि पिळगाव पंचायत यांच्या सहकायनि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मये येथेही महिलांसाठी अशाच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


माडाच्या झावळ्यांचा उपयोग केवळ 'मल्ल' तयार करण्यापुरता - मर्यादित नसून, त्यापासून विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू आणि कलाकृती साकारता येतात. झावळ्यांपासून टोपल्या, हॅट तसेच विविध आकर्षक सजावटीच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण महिलांना दिले जात आहे. पारंपरिक साधनसामग्नीला कलात्मकतेची जोड देऊन त्याचे रूपांतर उपयुक्त आणि विक्रीयोग्य वस्तूंमध्ये कसे करता येते, याचे मार्गदर्शन केरकर करीत आहेत.

 

'या कार्यशाळेमुळे माडाच्या झावळ्यांपासून नवीन कला शिकायला मिळत असून, या कलेचा उपयोग भविष्यात रोजगारनिर्मितीसाठी करता येऊ शकतो,' असे स्वाती शिरोडकर यांच्यासह सहभागी महिलांनी सांगितले.

 

पर्यावरण संवर्धन करा

सजावटीसाठी आज प्लास्टिक आदी पर्यावरणाला हानिकारक वस्तूंचा वापर होत आहे. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. पर्यावरणाचे संवर्धन करावयाचे असल्यास पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी माडांचे झावळ उपयुक्त आहे. माडाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या वस्तू दिसायला आकर्षक असतात. किनारपट्टी भागात पर्यटकांकडून या वस्तूंना मागणी असते. ही कला निश्चितच आर्थिक मिळकतीचे साधन आहे. टाकाऊ झावळ्यांचा सजावटीसाठी वापर होतानाच, त्यापासून आर्थिक कमाईही करता येते, असे कलाकार रामकृष्ण केरकर यांनी सांगितले.